महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

‘लाडकी बहीण योजने’ची ऑनलाईन स्टेटस ८-१० दिवसानंतरही ‘पेंडिंग’!

ऑनलाईन अर्ज स्थिती तपासता-तपासता लाडक्या भावांची मात्र दमछाक !

रत्नागिरी : राज्य सरकारने महिलांना त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेसाठी कागदपत्रांची जमवाजमाव करून आठ-दहा दिवसांपूर्वी अर्ज भरलेल्या महिलांच्या पदरी निराशा पडली आहे. ऑनलाईन अर्ज भरून आठ ते दहा दिवस उलटूनही ऑनलाइन स्थिती जराही बदलत नसल्याने ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीं’ची ऑनलाइन अर्ज स्थिती तपासता तपासता ‘लाडक्या भावांची’ मात्र दमछाक झाली आहे.

अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पिवळ्या तसेच केशरी शिधापत्रिकाधारक महिलांकरिता राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. यासाठी आधी जाहीर करण्यात आलेल्या काही अटी देखील शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळवणे महिलांना अधिक सुकर झाले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारात अर्ज दाखल करण्याची सुविधा राज्य सरकारने दिली आहे.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ‘नारीशक्तीदूत’ या मोबाईल ॲपवर लाडकी, बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले जात आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासह अर्ज देखील ऑनलाइनच भरायची सुविधा तेथे आहे. यासाठी जिल्ह्यातील शेकडो महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. मात्र, यातील अनेक महिलांच्या ऑनलाईन अर्जांची स्थिती अर्ज भरल्यानंतर आठ दहा दिवस उलटून देखील अर्ज मंजूर किंवा ना मंजूर झाल्याचा कोणताच रिमार्क दाखवत नसल्यामुळे अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरलेल्या महिला हवालदिल झाल्या आहेत. ऑनलाइन भरलेला आपला अर्ज मंजूर होईल ना, या चिंतेने काही महिला पुन्हा आपल्या अर्ज ऑफलाईन भरण्यासाठी अंगणवाडी ताईंना शोधू लागल्या आहेत.
कागदपत्रांची जमवाजमव करून भरलेल्या अर्जाची ऑनलाइन स्थिती आठ ते दहा दिवसानंतर नारीशक्तीदूत ॲपवर पेंडिंगच दाखवत आहे.

दरम्यान, ऑनलाईन भरलेले अर्ज तपासण्यासाठी योजनेतील ‘लाडक्या बहिणी’ घरातील ‘लाडक्या भावाला’ आपला अर्ज मंजूर झाला का, हे तपासण्यासाठी पुन्हा पुन्हा भाग पाडत आहेत. यामुळे लाडक्या बहिणींचे हे लाडके भाऊ मात्र चांगलेच वैतागले आहेत. त्यापेक्षा तुला पंधराशे रुपये मी देतो, पण मला छळू नको, असे म्हणण्याची वेळ या भावांवर आली आहे.
दरम्यान, नारीशक्ती ॲपवर आठ-दहा दिवसांपूर्वी भरलेले अर्जही अजून प्रलंबित दाखवत असल्यामुळे सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या मंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रमाणपत्र मिळवणाऱ्या लाभधारक महिललांसाठी मुख्यमंत्र्यांनी “जास्त लाडकी बहिण योजना” सुरू केली का, असा उपरोधिक सवाल अर्जाची ऑनलाईन स्थिती बदलत नसलेल्या महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button