उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे

काजूला मिळणारा कमी भाव ही चिंतेची बाब : नामदार नितेश राणे

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काजू क्षेत्र वाढवणार

चंदगड (कोल्हापूर):  सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे आपण लक्ष देऊ. तसेच काजूचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करू, असे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी चंदगड येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या चंदगड येथील उपविभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी कार्यालयाच्या कामाची पाहणी करून काजू उत्पादन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “कोकण आणि चंदगड यांच्या निसर्गामध्ये फारसा फरक नाही. काजू उत्पादन वाढले पाहिजे. कोकणचा काजू अतिशय चविष्ट आहे; मात्र बाहेरच्या भागातील काजू कोकणात आल्यावर त्याला स्पर्धा करावी लागते आणि तो दरात टिकत नाही. यावर उपाय शोधण्याची गरज आहे. डॉक्टर परशुराम पाटील यांनी यावर काम करावे. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला उपयोग होईल. माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करीन.”

या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ व गोवा-महाराष्ट्र नीती आयोग सदस्य डॉ. परशुराम पाटील, भाजप चंदगड तालुकाध्यक्ष दीपक पाटील, कृषी काजू प्रक्रिया उद्योग चंदगडचे अध्यक्ष नामदेव पाटील, मोहन परब, जयवंत शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी काजू मंडळातर्फे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. परशुराम पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत हा काजू उद्योगात एकेकाळी अग्रगण्य देश होता. जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा 94 टक्के इतका होता; मात्र सध्या तो घटून 3 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. हे उत्पादन वाढवणे अत्यावश्यक आहे.” यासाठी नामदार नितेश राणे यांनी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास चंदगड परिसरातील काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button