CM Maharashtra | लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी उद्या लांजातून सोडणार १४३ एसटी बसेस
लांजा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत उद्या रत्नागिरी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला लांजा एसटी आगारातून १४३ बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती लांजा एस.टी. आगार व्यवस्थापक सौ. काव्या पेडणेकर यांनी दिली.
लांजा एसटी स्थानकातून शालेय फेऱ्या आणि नियमित फेऱ्या यांच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आगार व्यवस्थापक यांनी यावेळी सांगितले. लांजा एसटी आगारातून २५ बसेस तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा आगारातून बसेस लांजा येथे उपलब्ध झाल्या आहेत. सर्व महिलांची अल्पोहार आणि पाण्याचे व्यवस्था प्रवासात करण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम रत्नागिरी येथील चंपक मैदानावर होणार आहे.
लांजा तालुक्यातील सर्व महिला बचत गटाच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका प्रशासनाला याची जबाबदारी देण्यात आली आहे. लांजा आगार व्यवस्थापक सौ. पेडणेकर यांनी सांगितले की, लांजा एसटी आगारातील नियमित फेऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. शालेय विद्यार्थी फेऱ्या नियोजित वेळेत सुटणार आहेत, असे हजारे व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अधिक माहिती घेतली असता सकाळी सुटणारी अक्कलकोट, लांजा-काजरघाटी -रत्नागिरी, आदी आधी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.