CNG | स्वतःचे सीएनजी स्टेशन सुरू करून बना उद्योजक!
- रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक गॅस पुरवठ्याचं सेवाक्षेत्र विस्तारणार!
- मुंबई-गोवा महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा, साखरपा अशा ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार
रत्नागिरी : डिझेल-पेट्रोलच्या मर्यादित साठ्यामुळे पर्यावरण पूरक असलेला इंधन म्हणून नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर करण्याकडे कल वाढला असतानाच ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही मोक्याच्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
इंधन म्हणून डिझेल पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमती, त्यांचा मर्यादित साठा या सर्वांचा विचार करून नैसर्गिक वायूचा वापर करण्याकडे कल वाढू लागला आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2019-20 मध्ये जिल्ह्यात सीएनजी गॅसचा पुरवठा होऊ लागला. सुरुवातीला रत्नागिरी या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाण व त्या पाठोपाठ मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या काही ठिकाणीच सीएनजी गॅसचा पुरवठा केला जात होता.
सीएनजी ( कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ) हा वायू पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रदूषण रोखण्यात त्याची मदत होत आहे. पेट्रोल डिझेलच्या तुलनेने तुलनेने तो स्वस्तही आहे. वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करण्याबरोबरच रत्नागिरी शहरापासून तो घरगुती वापरासाठी पीएनजी ( पाईप नॅचरल गॅस ) देखील पुरवला जाऊ लागला आहे. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस म्हणून त्याचा पुरवठा चार पाच वर्षापासून होऊ लागला आहे. आता या पर्यावरण पूरक गॅसचे सेवाक्षेत्र व्यापक केले जाणार आहे.
याआधी जिल्ह्यात अशोका गॅस कंपनीकडून ही सेवा पुरवली जात होती. आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये आधीपासूनच ही सेवा पुरवणाऱ्या महानगर गॅस या मोठ्या कंपनीने आधीच्या सेवा पुरवठादार कंपनीचा ताबा घेतला आहे. नव्या महानगर गॅस कंपनीने जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीकडून जिल्ह्यातील ही नवी सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांना स्वतःचे सीएनजी स्टेशन उभारण्याची संधी देताना 4 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविले आहे
गॅस पुरवठादार कंपनीच्या जाहिरातीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड, चिपळूण, आरवली, लांजा (हातखंबा ते लांजा), साखरपा अशा पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणारण्याचे प्रस्तावित आहे.