Good News | महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा प्रथम
- ‘परीक्षा पे चर्चा’उपक्रम
- संचालक, उपसंचालकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांचे कौतुक
रत्नागिरी, दि. १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांना तणावरहित वातावरण निर्मिती होण्यासाठी ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आहे. 28 डिसेंबर रोजी या उपक्रमात रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. अवघ्या दोन दिवसात तो राज्यात प्रथम ठरला. दोन दिवसात केलेल्या कामगिरीबद्दल शिक्षण संचालक, उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांचे कौतुक केले आहे.
ही एक चळवळ आहे जी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांना एकत्र आणण्यासाठी चालवली आहे. यात प्रत्येक मुलाला प्रोत्साहित केले जाते आणि स्वतःला पूर्णपणे अभिव्यक्त करण्याची परवानगी दिली जाते. ही चळवळ प्रेरणादायी आहे. ‘एक्झाम वॉरियर्स’ च्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी शिक्षणाबाबत एक दृष्टिकोन मांडला. विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि सर्वांगीण विकासाला प्राथमिक महत्त्व दिले जाते. अवाजवी ताणतणाव आणि दबावामुळे परीक्षांना जीवन-मरणाची परिस्थिती बनवण्यापेक्षा सर्वांनी योग्य दृष्टीकोनातून परीक्षा घेण्याचे आवाहन प्रधानमंत्री करतात.
सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालक यात सहभागी होवू शकतात. त्यांनी नोंदणी करुन प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तसेच स्वत:ही प्रश्न विचारायचे आहेत. ‘नमो ॲप एक्झाम वॉरियर्स’ मॉड्यूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तणावरहित वातावरण निर्मिती करणे हा प्रमुख उद्देश आहे.
शनिवार 28 डिसेंबर रोजी रत्नागिरी हा जिल्हा राज्यामध्ये या उपक्रमात शून्यावर होता. दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहसंचालक श्री पानझडे व उपसंचालक महेश चोथे यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिकचे सर्व मुख्याध्यापक यांची बैठक घेवून या कामास गती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी श्रीमती सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेवून प्रोत्साहित केले. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये जिल्ह्यातील 78 हजार 123 विद्यार्थी, 8 हजार 267 शिक्षक आणि 4 हजार 414 पालक यांचा सहभाग राहिला आहे. याबद्दल संचालक, उपसंचालकांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचे कौतुक केले आहे.