GreenRatnagiri | ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ अंतर्गत जनजागृती!

रत्नागिरी : स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ या मोहिमेला गती देण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने (GreenRatnagiri) पाऊल उचलले आहे. २५ डिसेंबर रोजी शहरातील टिळक आळी परिसर येथे ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज (14420)’ अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला.
या मोहिमेद्वारे नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. ‘स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी आणि हरित रत्नागिरी’ हे ध्येय समोर ठेवून प्रशासनाकडून विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन:
रत्नागिरीकरांनी शहराच्या स्वच्छतेत आणि पर्यावरणात हातभार लावण्यासाठी खालील सूत्रांचा अवलंब करावा:
- कचरा व्यवस्थापन: ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच तो घंटागाडीत द्यावा.
- प्लास्टिक बंदी: प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळा. त्याऐवजी कागदी, कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरा.
- प्रदूषण मुक्त सण: फटाके न फोडता ‘हरित सण’ साजरे करा, जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखता येईल.
- ऊर्जा बचत: सौर ऊर्जेचा वापर वाढवा आणि घरात LED दिव्यांचा वापर करून वीज वाचवा.
- जलसंधारण: पाण्याचा पुनर्वापर करा आणि पावसाच्या पाण्याचे (Roof Water Harvesting) पुनर्भरण करा.
- हरित रत्नागिरी: जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करा.
सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज (14420) काय आहे?
सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी आणि मॅनहोल ऐवजी मशीनद्वारे सफाईला प्रोत्साहन देण्यासाठी हे चॅलेंज राबवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी १४४२० या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा, अशी माहिती नगरपरिषदेमार्फत देण्यात आली.
रत्नागिरीला स्वच्छतेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.






One Comment