KisanCreditCard : किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे शिबिर

रत्नागिरी : पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट कार्ड (KisanCreditCard) योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी (शुक्रवारी सुट्टी असल्यास गुरूवारी ) तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायं ५ वा. या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गट विकास अधिकारी चेतन शेळके व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( फोटो २, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२ व ८ अ उतारा, असेसमेंट उतारा ग्रा पं नमुना नं ८, बँक पासबुक झेरॉक्स, पशुधन असल्याचा दाखला, पॅनकार्ड झेरॉक्स इ.) घेवून पंचायत समिती येथे उपस्थित रहावे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.
केंद्र शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय करीत असलेल्या पशुपालकांकडे स्वतःची किंवा भाडेतत्वावरील गोठा/शेड आवश्यक आहे. या क्रेडीट कार्ड च्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरीता लागणारा भांडवली खर्च उदा. खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजूरी, पाणी, वीज, चारा लागवडीसाठी येणारा खर्च इ. साठी कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे.
कॅश क्रेडीट २ लाखापर्यंत ७% व्याजाने व २ लाखावरील कर्ज ११ % कर्ज स्वरूपात पशुपालकास उपलब्ध होणार आहे. या कर्जाची परतफेड विहित मुदतीत व नियमित झाल्यास नाबार्ड कडून ३ % पर्यंत केंद्र शासन व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यास ४ % दराने कर्ज ज्यांचेकडे पशुधन आहे त्यांना पुढील देखभालीसाठी उपलब्ध होणार आहे. सदर योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे.





