Konkan on Alert Mode | रायगड-रत्नागिरीमध्ये SDRF च्या तुकड्यांना सज्ज राहण्याच्या सूचना
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी : रत्नागिरी रायगड जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी ‘एसडीआरएफ’ला तैनात राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच मागील २४ तासांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी तर राजापूरमधील कोदवली या दोन प्रमुख नद्या धोका पातळीच्या वरून वाहत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली आहे.
पावसाची सद्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्रीच सोमवारी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या या संदर्भातील आदेशानंतर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी आपापल्या व्हाट्सअप ग्रुपमार्फत विद्यार्थी तसेच पालकांना या संदर्भातील माहिती रविवारी रात्री उशिराने दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड तसेच रत्नागिरीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचे पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व बचाव दलाच्या (SDRF) तुकड्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली आहे.