Konkan Railway | कोकण रेल्वेची वाहतूक अखेर २४ तासांनंतर सुरु
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळून रविवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक तब्बल 24 तासांच्या प्रयत्नानंतर पूर्वपदावर आणण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू होताच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा रिकामा रेक पहिल्यांदा घटनास्थळावरून रवाना करण्यात आला.
खेड तालुक्यातील दिवाणखवटी नजीक रविवारी सायंकाळी चार वाजून 48 मिनिटांनी मुसळधार पाऊस सुरू असताना दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे दिनांक 14 व 15 रोजी च्या या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. विविध स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना कोकण रेल्वेने शेकडो एसटी बसेसमधून मुंबई तसेच पनवेलच्या दिशेने पाठवले.
सोमवारी सायंकाळी वाहतूक सुरू झाल्यानंतर दुर्घटनाग्रस्त पहिली गाडी मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.