Konkan Railway | कोकण रेल्वेमार्गे प्रवास करत असाल तर तपासा आपल्या गाडीची वेळ!

- आजपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. यावेळी पाच दिवस उशिरा म्हणजे 15 जूनपासून 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे. पावसाळ्यासाठीच्या या स्वतंत्र वेळापत्रकामुळे जनशताब्दी एक्सप्रेससह काही गाड्यांच्या वेळेत काहीसा बदल केला जात असल्याने प्रवाशांनी नव्या वेळापत्रकानुसार आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.
गाडीची वेळ तपासून रेल्वे प्रवाशांनी गोंधळ टाळावा
दरवर्षीच्या अनुभवानुसार जून मध्ये जेव्हा पावसाळी वेळापत्रक सुरू होते, तेव्हा काही गाड्यांच्या वेळेत होणारा बदल रेल्वे प्रवासी ध्यानात न घेता रेल्वे स्थानकावर पोहोचतात. यामुळे काहींची गाडी पावसाळी वेळापत्रकानुसार निघून गेलेली असते किंवा काहींच्या बाबतीत गाडी येण्यासाठी सुधारित वेळापत्रकानुसार वेळ असतो म्हणजे ते खूपच आधी पोहोचतात.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक यावर्षी 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवले जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने यापूर्वीच सविस्तर वेळापत्रकासह काही गाड्यांच्या वेळेत होणाऱ्या बदल प्रवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केला आहे. तरीही दरवर्षी जेव्हा लागू होतो तिथपासून पुढील दोन-तीन दिवस काही प्रवाशांचा गोंधळ उडतो आणि असे प्रवासी रेल्वे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी वाद घालतात, असा अनुभव आहे. ही कटुता टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या प्रवाशांनी पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे, हे लक्षात घेऊन आपण प्रवास करीत असलेल्या गाडीची वेळ तपासून घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.