Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द
दिल्लीहून येणारी मंगला एक्सप्रेस पर्यायी मार्गाने वळवली
पणजी : कोकण किनारपट्टीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे टनेलमधून पाणी वाहू लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज बुधवारी धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांसाठी प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा परतावा बुकिंग काउंटरवर तत्काळ देण्याची व्यवस्था कोकण रेल्वेकडून सुरू झाली आहे.
या गाड्या रद्द ⬇️⬇️⬇️
कोकण रेल्वेच्या कारवार रीजनमधील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी वाहू लागले आहे. दिनांक ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी
रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आजही दिनांक 10 जुलै 2024 रोजी पहाटे 2.59 वाजण्याच्या सुमारास पेडणे बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेनकडून या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.
या आधीची पुनरावृत्ती
या आधी देखील कोरोना काळात पेडणे येथील बोगद्यात पाणी वाहू लागल्यामुळे रेल्वेच्या सेवेत व्यत्यय आला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती दिनांक 9 जुलैपासून होऊ लागली आहे. आज दिनांक 10 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही समस्या पुन्हा उद्भवल्यामुळे पुन्हा रेल्वे सेवेत बाधा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने बुलेटीनद्वारे कळवले आहे. मात्र आणखी काही गाड्या रद्द होऊ शकतात अशी स्थिती आहे.
दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी नजीकच्या निवसर येथे देखील रुळाखालून पाणी वाहू लागल्यामुळे रुळ खचण्याचे प्रकार घडत होते. या समस्येचा सामना कोकण रेल्वेने अनेक वर्षे केला. अखेर ज्या ठिकाणी रूळ खचत होते, तिथला रेल्वे मार्ग बदलून त्याच भागातील दुसऱ्या ठिकाणी रेल्वे रुळ टाकावे लागले. त्यानंतरच ही समस्या निघाली निघाली आहे. या कामावर कोकण रेल्वेला कोट्यवढी रुपयांचा खर्च करावा लागला. अशाच प्रकारची स्थिती पेडणे येथे तर निर्माण होत नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.
पेडणे येथील बोगद्यात सध्या निर्माण झालेल्या समस्येमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आले आहेत तर अनेक गाड्या या समस्येमुळे मार्गावरच खोळंबून राहिल्या आहेत.