Konkan Railway | दादर-रत्नागिरी पॅसेंजरसंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर आ. भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने बैठक

चिपळूण : कोरोनाच्या नावाखाली चार वर्षांपासून दादर ऐवजी दिव्यापर्यंतच धावत असलेली रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच रत्नागिरीसाठी सोडावी, असा निर्धार आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी आवाज उठवल्यानंतर बुधवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कोकण रेल्वे संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
कोकणातील रेल्वे प्रवाशांना दररोज होणार्या त्रासाबाबत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मुंबईत मंत्रालयातील दालनात पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीचे आयोजन आमदार भास्कर जाधव यांच्याच पुढाकारातून करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आ. भास्कर जाधव यांनी विधानसभेतही कोकण रेल्वे संबंधित प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
कोकण रेल्वे मार्गावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत आमदार जाधव यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसमोर ठोस मागण्या मांडल्या. यामध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करणे, पनवेल ते चिपळूण दरम्यान नवीन गाडी सुरू करणे, तसेच रत्नागिरी व चिपळूण येथे रेल्वे आरक्षण कोटा वाढवणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता.
बैठकीला उपस्थित असलेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, या प्रस्तावांना रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द दिला.
या बैठकीमुळे कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांच्या अडचणी लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या सक्रीय सहभागामुळे ही बैठक फलदायी ठरली असून, प्रवाशांच्या हितासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.