Konkan Railway | मडगाव स्थानकावर अत्याधुनिक व्हिडिओ वॉलचे लोकार्पण

मडगाव (गोवा): कोंकण रेल्वे महामंडळाने प्रवाशांच्या सुविधा आणि माहिती उपलब्धतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक व्हिडिओ वॉलची सउभारणी केली आहे. या व्हिडिओ वॉलचे उद्घाटन श्री संतोष कुमार झा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD/KRCL) यांच्या हस्ते तसेच श्रीमती मनीषा झा, अध्यक्षा, कोंकण रेल्वे महिला कल्याण संघ (KRWC) आणि SSA यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

ही आधुनिक व्हिडिओ वॉल प्रणाली प्रवाशांना रिअल टाइम ट्रेन माहिती, महत्त्वाच्या घोषणा, सुरक्षा संदेश आणि पर्यटनाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी देणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुलभ आणि माहितीपूर्ण होईल.

कोंकण रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सुविधा सुरु केल्या आहेत — ऑनलाइन तिकीट सेवा, डिजिटल माहिती केंद्रे, आणि स्मार्ट डिस्प्ले बोर्ड्स या उपक्रमांनंतर आता ही नवीन व्हिडिओ वॉल प्रवासी सेवेत महत्त्वाची भर घालणार आहे.

श्री झा यांनी उद्घाटनावेळी सांगितले की, “कोंकण रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध आहे. ही व्हिडिओ वॉल प्रणाली आमच्या डिजिटल उपक्रमांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
ही सुविधा सध्या मडगाव स्थानकावर सुरू करण्यात आली असून, लवकरच कोंकण रेल्वेच्या इतर प्रमुख स्थानकांवरही अशा डिजिटल वॉल्स बसवण्याचे नियोजन आहे.





