Konkan Railway | बांद्रा-मडगाव नवी ट्रेन बोरिवलीहून कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी सज्ज!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी दुपारी बोरिवली रेल्वे स्थानकात होत आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर रवाना होण्यासाठी बोरिवली येथे दाखल झाली आहे. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून मडगाव ते वांद्रे या मार्गावर नियमितपणे या गाडीच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर थांबे देण्याची जोरदार मागणी
कोकणवासी यांच्या मागणीनुसार ही गाडी जाहीर झाली खरी मात्र गाडीचे थांबे ठरवताना रेल्वेने प्रवासी जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न मिळाल्याने नवी गाडी मिळाल्याच्या आनंदापेक्षा गाडीला देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांवरून रेल्वेवर प्रचंड टीका होत आहे. गाडीच्या नियमित फेऱ्या या ३ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत. याचा विचार करता रेल्वेला अजूनही गाडीला पुरेसे थांबे देण्याची संधी आहे.