Konkan Railway | जगप्रसिद्ध ‘हापूस’ रेल्वेने गुजरातला रवाना !
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पार्सल सेवेमार्फत जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या चालू हंगामातील पहिल्या तीन पेट्या मंगळवारी गुजरातमधील वेरावलकरिता वेरावल एक्स्प्रेसने रवाना झाल्या. सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी आपला हापूस आंबा ग्राहकांपर्यंत सुरक्षित तसेच जलदगतीने पोहचून त्यांना त्याचा स्वाद घेता यावा, यासाठी कोकण रेल्वेच्या रेल्वे पार्सल सेवेला काही वर्षांपासून पसंती दिली आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान, चंदीगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यात थेट रेल्वे सेवा असल्याने हापूस आंबा हंगामात ग्राहकांना बाजारात उपलब्ध करून देण्यात सोयीस्कर झाले आहे.
याचबरोबर रेल्वे पार्सल सेवा दर किफायतशीर असल्याने होलसेल व्यापारी यांनी कोकण रेल्वेला पसंती दिली आहे. ‘कोरे’च्या पार्सल सेवेमार्फत मंगळवारी 70 किलोच्या आंबा पेट्या गुजरातसाठी रवाना झाल्या. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वे पार्सल टेबलचे वैभव तळेकर यांच्या अनुश्री पार्सल सेवेच्या माध्यमातून या हापूस आंबा पेट्या वेरावल येथील व्यापार्यांना पाठविण्यात आल्या.
रेल्वे पार्सल सेवेमार्फत आंबा पाठवण्याच्या शुभारंभावेळी रत्नागिरी वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सौ. शुभदा देसाई, वाणिज्य सहाय्यक रवी राणे, घाटकर उपस्थित होते.