Konkan Railway | मुंबईतील मालगाडी अपघाताचा कोकण रेल्वेला फटका ; काही गाड्या रद्द तर काही पर्यायी मार्गे वळवल्या

मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडी घसरून झालेल्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले आहे. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी-मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण-मिरज, लोंढा मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये दररोज धावणाऱ्या सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे
शनिवारी सायंकाळी पनवेलजवळ भरलेली मालगाडी घसरल्याने रेल्वेचे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडीला झालेल्या अपघातामुळे पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अनेक गाड्या त्यांच्या निर्धारित ठिकाणाआधीच थांबवून शॉर्ट टर्मिनेट केला जात आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्यागाड्यांना देखील याचा फटका बसला आहे. शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मालगाडी घसरल्यामुळे झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा विचार करता कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या गाड्यांचे लाईव्ह स्टेटस पाहून तसेच अधिक माहिती मिळवून प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.