Mumbai-Goa Highway | महामार्गावर बावनदी ते वाकेड भागात ५० हजार रोपांची दुतर्फा लागवड सुरु
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यात सुमारे 50 हजार झाडे महामार्ग दुतर्फा लावण्याचे काम सुरू झाले आहे. 3 कोटी 22 लाख रूपये या वृक्ष लागवडीवर खर्च होणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाचे हिरवेगार रूप पुन्हा बहरणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बावनदी ते वाकेड या दरम्यान 23 हजार झाडे तोडण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वृक्षप्रेमींच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महामार्ग हरित महामार्ग होइल, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत या महामार्गावर पुन्हा नव्याने देशी वाणाची वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई गोवा महामार्गाचे उपअभियंता अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, बावनदी ते वाकेड या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा देशी वाणाची सुमारे 50 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या अगोदर चौपदरणीकरणाच्या कामात 23 हजार झाडे तुटली आहेत. वन विभागाचे सहकार्य घेऊन पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी कोकणतल्या मातीत वाढणारी वड, पिंपळ, आंबा, निम ताम्हण, कदंब, कांचन, आवळा, अर्जून, आपटा, महोगनी, पिंपळ, पांढरा शेवगा, जांभूळ या सारख्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. यासाठी वन विभागाच्या रोपवाटिकेतून एक वर्षापेक्षा जास्त वय असणारी झाडे आणण्यात आली आहेत.
पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी रस्त्याचे काम सुरू असताना ही वृक्ष लागवड करण्यात येत आहे
रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटरमध्ये छोटी, मध्यम आणि मोठी अशी तीन प्रकारची ची झाडे लावली जातील. चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या तीप्पट झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये स्थानिक हवामानात वाढतील आणि भरपूर प्राणवायू सोडणाऱ्या झाडांची निवड करण्यात येणार आहे.
वृक्ष लागवडीचे तंत्र निश्चित केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार सोडून एक मीटरापासून वृक्ष लागवडीस सुरवात होईल. सात मीटर अंतरावर झाडे लावण्यात येतील. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे असतील. चढत्या क्रमाने झाडे लावली तर ध्वनी प्रदुषणाचा त्रास होणार नाही आणि पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील.
- हे सुद्धा वाचा : Konkan Railway | गणपती स्पेशल गाड्यांचे असे आहे टाईम टेबल!
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
यासाठी लागणारी झाडे मिळविण्यासाठी कंत्राटदाराने जवळच्या नर्सरीधारक किंवा वन विभागाची मदत घ्यावयाची आहे.प्रति किलोमीटरला ५३८ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्चित केले आहे. लागवड केलेल्या झाडांची देखभाल 15 वर्ष संबंधित ठेकेदाराला करावी लागणार आहे