Pahalgam terror attack | भारतीय नागरिकत्वासाठी दोन पाकिस्तानी महिलांचे अर्ज

रत्नागिरी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांबाबत कठोर भूमिका घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने सुरू असलेल्या तपासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी महिला वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या महिलांनी भारतीय पुरुषांशी विवाह केल्यामुळे त्या येथे राहत आहेत. यापूर्वी त्यांनी त्यांच्या स्पाऊस व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता.
दरम्यान, आता या दोन पाकिस्तानी महिलांनी भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या अर्जांवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी सुरू असताना दापोली तालुक्यातील या दोन महिलांच्या भारतीय नागरिकत्वाच्या अर्जांमुळे प्रशासनासमोर एक नवीन पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.