महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट-क परीक्षा केंद्र परिसरात २५ आॕक्टोबर ते ३ नोव्हेंबर प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी दि. २३ (जिमाका) : आयुक्त तथा संचालक तथा अध्यक्ष निवड समिती नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ ही परीक्षा रत्नागिरी जिल्ह्यात राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॕन्ड टेक्नॉलॉजी आंबव (देवरूख) ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी आणि घरडा फाऊंन्डेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल ता.खेड जि.रत्नागिरी या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे जिल्हयातील उपरोक्त नमूद केलेल्या परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे.
सदर आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल.
परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचेबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत, मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.