Ratnagiri | पाणी गळती रोखण्यासाठी एकाच प्रभागात लाखो रुपयांचा खर्च : नौसीन काझी
- कीर्ती नगर, कोकण, नगर क्रांतीनगर भागात आतापर्यंत जवळपास ४५ वेळा गळती
रत्नागिरी : शहरातील कीर्ती नगर, कोकण नगर आणि क्रांतीनगर या भागातून गेलेल्या मुख्य रस्त्याच्या खालून टाकण्यात आलेल्या नवीन पाणी योजनेच्या जलवाहिनीला एक नव्हे, दोन नव्हे तर आतापर्यंत तब्बल ४० ते ४५ वेळा गळती लागल्याच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेच्या या एकाच प्रभागात नळ आणि योजनेच्या लिकेज काढण्यावर आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सेलचे कार्याध्यक्ष नौसीन अहमद काझी यांनी केला आहे.
शहरातील नवीन पाणी योजनेच्या जलवाहिनीच्या गळतीच्या घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. नौसीन काझी यांनी म्हटले आहे की, नळपाणी योजना पाण्यात कशी गेली आहे त्याचे पुरावे शहरातील नागरिकांना हवे असतील तर त्यांनी रत्नागिरी शहरातील कीर्ती नगर, कोकण नगर, क्रांतीनगर या भागात येऊन पाहवे. या भागातून जो मुख्य रस्ता जातो त्यातूनच नवीन नळपाणी योजने अंतर्गत पाण्याची लाईन गेलेली आहे. ही जलवाहिनी आतापर्यंत ४० ते ४५ वेळा लीकेज झाल्याचे पुरावे निदर्शनात येतील, असेही श्री. काझी यांनी म्हटले आहे.
जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्यामुळे स्थानिक नागरिकांची पाण्याची गैरसोय होते. रहदारीचा रस्ता खराब होतो. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रभागातील नागरिकांना सोसावा लागत आहे. ही बाब वेळोवेळी न.प. प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही योग्य पाऊले अजूनही उचलण्यात आलेली नाहीत.
– नौसीन अहमद काझी
रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस.
सर्वसाधारणपणे जलवाहिनीची एक गळती काढण्यासाठी काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला ७ ते १० हजार रुपये इतका खर्च येतो. याचा अर्थ आतापर्यंत लिकेज दुरूस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपये (नागरिकांच्या टॅक्सची रक्कम) फक्त या एका प्रभागात खर्च झाली असल्याचा आरोप श्री. काझी यांनी केला आहे.