मतदान केंद्र सुसुत्रीकरण, पुनर्रचनेबाबत आठवड्यात सूचना, हरकती नोंदवा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 25 : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यातील (263- दापोली, 264-गुहागर, 265-चिपळूण, 266- रत्नागिरी, 267-राजापूर) या एकूण 5 विधानसभा मतदारसंघांत राबविण्यात येत आहे. पूर्वपुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून 29 मे 2023 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत मतदारांची पडताळणी करण्याकामी सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत गृह भेटीचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनादेखील करण्यात येत आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सूचना द्यावयाची असल्यास या कार्यालयास सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास पुढील 7 दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकूण 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील 1500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
या प्रस्तावातील बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांच्या कार्यालयास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोग यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
हे बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी परिशिष्ट-1 मध्ये दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसीलदार कार्यालये, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, सर्व गटविकास अधिकारी कार्यालयात जाहीररित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तसेच त्याच्या प्रती रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना, सर्व लोकसभा सदस्य, सर्व विधानसभा सदस्य यांनाही पुरविण्यात आलेल्या आहेत. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी सूचना द्यावयाची असल्यास या कार्यालयास सूचना, आक्षेप किंवा हरकत आसल्यास 7 दिवसांच्या आत त्या नोंदविण्यात याव्यात. वरील नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजुरीनंतर मतदान केंद्राची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.