कोकणातील नदी-नाल्यांवर चढणीचे मासे पकडण्याची मजाच न्यारी!
लांजा : लांजा तालुक्यात शेतीबरोबरच चढणीचे मासे पकडण्याची खवय्यांची नदी-नाले यांच्याकडे पावले वळू लागली आहेत. थोड्याफार फरकाने कोकणातील बहुतांश गावांमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठीची लगबग आजही पाहायला मिळते. पावसाने जोर धरल्याने आणि ओढ्यांना पाण्याचा पुरेसा प्रवाह सुरू झाल्याने गोड्या पाण्याचे मासे चढण्यास सुरुवात झाली आहे.
मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने दोन दिवस जोर धरल्याने नदी-नाले यांना पाणी झाले आहे. तालुक्यात शेतीच्या कामानाही वेग आला आहे. ग्रामीण भागात पारंपरिक मासेमारीची गोड्या पाण्यातील ‘चढणीचे मासे’ पकडण्याची पद्धत आहे. आजही शेतकरी गावागावात चढणीचे मासे पकडण्यासाठी नदी नाल्यांकडे वळताना पाहायला मिळतात. पावसाळा सुरु झाला की, कोकणी माणसाची शेतीच्या कामाची लगबग सुरु होते. मात्र, या शेतीच्या कामातूनही वेळात वेळ काढून चढणीचे मासे पकडण्याची मज्जा तो दिवसा किंवा रात्री घेत असतो.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोकणातल्या बहुतांश नद्या या प्रवाहित होत असल्या तरी डोंगर द-यातील पाण्यातील झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी तर काही नदयांत तो कोरडा असतो. नद्यांमधील मोठमोठे डोह व कोंडी या पाण्याने भरलेल्या असतात. उन्हाळ्यात पाणी जसे कमी कमी होत जाते तसे या नदयांमधील मासे या डोहात जमू लागतात.
पावसाळा सुरु झाला की, डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते. याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात, छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकून पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावून शेतघरातच भाजूनही खातात.
चढणीच्या माशांमध्ये सर्वात चवीष्ट व मोठ्या प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे ‘मळ्या मासा’. कोकणामधील विविध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात.