Vande Bharat Express | मुंबई-मडगाव वंदे भारतला सलग दुसऱ्या फेरीसाठी उदंड प्रतिसाद ; ९४.१५ टक्के झाले बुकिंग!
गाडी सुटेपर्यंत आरक्षण जाणार १०० टक्क्यांच्या वर!
रत्नागिरी : विमानासारख्या सुविधा असल्या तरी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट कुणाला परवडणार, असा नकारात्मक सूर काही लोकांकडून आळवला जात असताना कोकण मार्गावरील वंदे भारतने हा अंदाज खोटा ठरवत 30 जून रोजी होणाऱ्या सलग दुसऱ्या फेरीसाठी गुरुवारी सायंकाळ अखेर पावणे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या घरी साठी एकूण 530 पैकी 499 जागांचे आरक्षण झाले आहे.
मुंबई सीएसएमटी ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला (22229/22230) पंतप्रधानांनी भोपाळ येथून मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यापाठोपाठ काल दिनांक 28 जून रोजी मुंबई मडगाव मार्गावर झालेल्या तिच्या नियमित फेरीतून तिने सहा लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. दिनांक 29 जून रोजी च्या मडगाव ते मुंबई मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेसने रेल्वेचे तिजोरीत चांगली भर घातली.
दिनांक 30 जून 2023 रोजी या गाडीची (22229) मुंबई ते मडगाव मार्गावरील दुसरी नियमित फेरी होत आहे. या फेरीला देखील प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद लावल्याचे या गाडीसाठी झालेल्या बुकिंग वरून निदर्शनास आले आहे. गुरुवारी सायंकाळ अखेर कोकण मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस साठी 30 जून रोजी च्या फेरीसाठी 94.15% इतके बुकिंग झाले आहे. हे अपडेट्स हाती आले तेव्हा गाडी सुटण्यासाठी अजून दहा ते अकरा तास शिल्लक आहेत. म्हणजेच अजूनही जवळपास 11 तास बुकिंग करता येणार आहे. ही स्थिती लक्षात घेता शुक्रवार दिनांक 30 रोजी होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या दुसऱ्या कमर्शियल फेरीसाठी 100% पेक्षा अधिक बुकिंग होईल असा रेल्वेला विश्वास आहे.
अप दिशेचा प्रवासी कोटा वाढवण्याची मागणी
मडगाव ते मुंबई मार्गावर धावताना वंदे भारत एक्सप्रेसला (22230) रत्नागिरी तसेच खेड करता केवळ चेअर कारचा 22 आसानांचा तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा 4 आसनांचा कोटा देण्यात आला आहे. या अल्प कोट्याचा बुकिंगला फटका बसण्याची शक्यता आहे. नव्हे तर दिनांक 29 रोजी च्या मडगाव मुंबई फेरीच्या वेळी याचा प्रत्यय देखील आला आहे. त्यामुळे रत्नागिरी तसेच खेड स्थानकांसाठीचा अप डिरेक्शनचा कोटा वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र कोटा कमी असला तरी गाडी मडगाव येथून सुटल्यानंतर म्हणजेच दुसरा आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर उपलब्ध असलेली तिकिटे मडगाव, कणकवलीनंतर रत्नागिरी तसेच खेडसाठी बुकिंगकरिता उपलब्ध होऊ शकतात. यामुळे रत्नागिरी, खेडसाठी सध्या कोटा देण्यात आलेली 22 तिकिटे बुक झाल्यानंतरही त्यांनी वेटिंगवरची तिकीट घेतली असतील त्यांची तिकिटे गाडी मडगाव कणकवली वरून सुटल्यानंतरही आसने खाली असतील तर कन्फर्म होऊ शकतात हे प्रवाशांनी ध्यानात घायला हवे.