Western Railway | गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना नव्या रेल्वे गाडीची भेट मिळण्याची आशा
रत्नागिरी : मागील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली आणि मुंबईतील पश्चिम उपनगरातून कोकणसाठी कायमस्वरूपी गाडी सुरू करण्याबाबतची मागणी पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबईतून वसई रोड मार्गे थेट कोकण रेल्वे मार्गावर येणारी कायमस्वरूपी ट्रेन नसल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.
सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून मुंबईतून पश्चिम उपनगरामधून कायमस्वरूपी कोकण रेल्वे मार्गावर येणारी गाडी नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुटणाऱ्या गाड्यांसह दिल्ली तसेच गुजरातकडून येणाऱ्या गाड्यांवर उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांना अवलंबून राहावे लागते. मात्र, ही गैरसोय येत्या गणेशोत्सवापूर्वी दूर होऊ शकेल, या दृष्टीने रेल्वे मंत्रालय स्तरावर पावले उचलली जात आहेत.
दीर्घकाळचा पाठपुरावा फळाला
पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून मुंबई सेंट्रल, बोरिवली किंवा वांद्रे येथून वसई मार्गे कोकण रेल्वेच्या मार्गावर थेट येणारी गाडी सुरू कराव, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र वसईला आल्यानंतर गाडीचे इंजिन उलट्या दिशेला फिरवण्याचा खटाटोप करावा लागत असल्याचे कारण सांगून ही मागणी अद्यापही प्रलंबितच राहिली आहे. मात्र, त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. अशी कायमस्वरूपी कोकणात येणारी गाडी गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची अशा निर्माण झाली आहे. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी मुंबईतील कोकणवासीयांचा समावेश असलेल्या प्रवासी संघटनांचे प्रयत्न फळाला येत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच वेगवेगळ्या संघटनांची एकत्रित बैठक देखील मुंबईत पार पडली होती. यामध्ये कोकणवासीयांच्या रेल्वे विषयक समस्यांवर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या आठ-दहा दिवसातही ही गाडी सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार ही गाडी बोरिवली येथून सुटेल असे समजते. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीय प्रवासी जनतेला ‘बाप्पा पावला’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र, या संदर्भात रेल्वेमार्फत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.