मत्स्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना तिलापिया केज कल्चरचे कोल्हापूर येथे कार्यानुभव प्रशिक्षण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत, शिरगांव रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र ५ मधील विद्यार्थ्यांचे Aquaculture Engineering च्या सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव कालावधीमध्ये तिलापिया केज कल्चर ‘ महाराष्ट्र फिशरीज ‘ Tulshi Dam, कोल्हापूर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान श्री. अमित सावंत व विनय खोपडे यांच्या मालकीच्या ‘ महाराष्ट्र फिशरीज’ या तिलापिया केज कल्चर युनिट वर मत्स्य अभियांत्रिकी पदविका शिरगांव, रत्नागिरी येथील प्राचार्य डॉ. आशिष मोहिते व सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी भेट दिली आणि ‘ महाराष्ट्र फिशरीज ‘ बद्दल माहिती करून घेतली.
तेथील मॅनेजर युवराज मोहिते तसेच संदीप पौंडकर यांनी विद्यार्थ्यांना तिलापिया केज कल्चर विषयी माहिती करून दिली. या तिलापिया केज कल्चर युनिटमध्ये ६(लांबी) X ४(रुंदी) X ४(उंची) मीटर आकाराच्या ४८ मत्स्य संवर्धन पिंजऱ्यांमध्ये तिलापियाचे संवर्धन केले जाते. याच ठिकाणी छोट्या आकाराच्या पिंजऱ्यांमध्ये गोल्ड फिश, कोई कार्प, पोलार व्हाईट पॅरट फिश ई. शोभिवंत माश्यांचे सुद्धा संवर्धन केले जाते.
हे शोभिवंत मासे तरंगते आणि बुडते मत्स्यखाद्य यांवर वाढवले जातात. ‘ महाराष्ट्र फिशरीज’ चे वैशिष्ट म्हणजे मत्स्य पालनाचे योग्य ते व्यवस्थापन करून संपूर्ण वर्षभर जिवंत ‘तिलापिया’ हा मासा कोल्हापूर आणि पनवेल येथे तसेच मागणीनुसार राज्यभरात पुरवठा केला जातो.
या प्रशिक्षणामध्ये कु. कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णुकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ.आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.