अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाच्या पायाचे दोन तुकडे
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा तिठ्यानजीक तरुणाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा तिठयानजिक एका ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (२ मार्च २०२३) रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. या अपघातातील तरुणाच्या पायाचे अपघातस्थळी दोन तुकडे झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनाने तेथून पळ काढल्याचे वृत्त आहे.
या अपघातातील तरुणाचे प्रशांत होरंबे (३५ राहणार, पानवळ) असे नाव आहे. प्रशांत होरंबे हा सायंकाळी ७ च्या सुमारास भोके रस्त्याने जात होता. ईश्वर धाबा ते शांती धाबा या भागातील रस्ता पूर्ण खडबडीत असल्यामुळे चौपदरीकरणाची एक लेन सुरू करण्यात आली आहे. या काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरुन वाहने भरधाव वेगाने जात असतात. प्रशांत होरंबे हा तरुण गुरुवारी (2 मार्च) घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, प्रशांतच्या एका पायाचे जाग्यावरच दोन तुकडे झाले. मात्र प्रशांत हा दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात आहे. ही धडक चारचाकी वाहनाने दिल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. आता फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. तसेच या भागात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर पोलीस धाड टाकणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
या घटनेची माहिती जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज नाणिज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना देण्यात आली. काही मिनिटात केतकर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.