आरवली उड्डाणपुलाखालील काँक्रिटीकरण पूर्ण

- आता बाजारपेठेत केवळ अंशतः काँक्रिटीकरण अपूर्ण
रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतील रखडलेल्या आरवली( संगमेश्वर) ते वाकेड ( लांजा) या टप्प्यातील आरवलीच्या उड्डाणपुलाखाली असणारा रस्ता उड्डाणपूल पूर्ण होऊनही चिखलमय झाला होता. या महामार्गाची या ठिकाणची बाजारपेठेतील मुंबई गोवा दिशेने ठेवण्यात आलेल्या सर्व्हिस रोड पावसा आधीच काँक्रिटीकरण करून पूर्ण झाला असून त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे. मात्र, गोवा मुंबई दिशेने सोडण्यात आलेला सर्विस रोडचे काँक्रीटकरणाचे काम मात्र अजून अपूर्णच आहे. येथील बाजारपेठेतील दुसऱ्या बाजूचे सर्व्हिस रोडचे काम रत्नागिरीहून चिपळूण जाताना माखजन ते कुंभारखाणी रस्ता जिथे छेदून जातो तिथपर्यंतच पूर्ण करण्यात आले आहे. त्यापुढे चिपळूणच्या दिशेने काम मात्र अपूर्णच आहे. त्यामुळे रत्नागिरीहून चिपळूण कडे जाताना वाहने सर्विस रोडवर न येता उड्डाणपुलावरूनच जात असल्यामुळे येथील थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना उड्डाणपुलाच्या पुढे किंवा मागे बरेच दूरवर तात्पुरत्या थांब्यावर उतरविले जात आहे.

दुसऱ्या बाजूच्या सर्विस रोडचे काँक्रीटकरणाचे काम काम देखील ठेकेदाराने सुरू केले असले तरी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने त्यात व्यत्यय निर्माण झाल्या आहेत. मात्र माखजन ते कुंभारखाणी या मार्गाचा भाग असलेल्या आरवली बाजारपेठेतील उड्डाणपुलाखालील सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागाचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे स्थानिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.