आरोग्य हिच खरी संपत्ती : महेश वेल्हाळ

पालशेत येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर : आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असून या शिबिराच्या माध्यमातून मानवसेवा घडत असल्याचे प्रतिपादन पालशेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश वेल्हाळ यांनी केले.
पालशेत ग्रामस्थ व अपरांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सुभाष विलणकर यांच्या निवास्थानी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच महेश वेल्हाळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन आणि छ. शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सुमारे १६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
पालशेत पंचक्रोशीतील गरजू रुग्णांना चिपळूण सारख्या ठिकाणी जावून आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. यासाठी मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याची दखल घेऊन सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार, इसीजी तपासणी, शरीरातील कॅल्शियम प्रमाण, रक्तदाब, ऑक्सिजन लेवल, यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर पुढील उपचारासाठी हॉस्पिटल मार्फत १० ते २० टक्के कुपन रुग्णांना वाटप करण्यात आले.

या शिबिरासाठी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराला डॉ. विखारे, अशोक चव्हाण, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक बंटी नागवेकर, हरीश वेल्हाळ, राजू नरवणकर, नितीन कनगुटकर, मनोहर पाटील, योगेश वायंगणकर, साहिल वासावे, सुधांश आरेकर, अक्षय पटेकर, विशाल डोर्लेकर, मीनार पाटील, नरेंद्र नार्वेकर, दीपराज पाटील, मयूर पाटील, ओमकार पाटील, अनुज पाटील, निखिल पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे आदी उपस्थित होते.