उरणमधून होळीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी जादा गाड्यांची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आलेली आहे. उरण ते रत्नागिरी, उरण ते सिंधुदुर्ग,उरण ते खेड, उरण ते दापोली, उरण ते देवरुख, उरण ते कणकवली, उरण ते गणपतीपुळे या मार्गावर जादा बस सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
उरण शहरात व उरण तालुक्यातील विविध गावात कोकणातील अनेक व्यक्ती मोठया प्रमाणात वास्तव्यास आहेत. उरण शहरातील व विविध गावातील अनेक चाकरमानी होळीला गावी कोकणात जात असतात. कोकणात होळी सणासाठी प्रवास करताना कोकणी माणसाला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत, कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा, सुलभ व्हावा या दृष्टिकोनातून दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण)च्या पाठपुराव्याने दरवर्षी उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी व उरणमध्ये परत येण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्थे (उरण)तर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आलेली आहे. या जादा बस सोडण्यासाठी संस्थेचे सचिव रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी उरण बस आगार तसेच मुंबई कार्यालय, मुंबई उपविभाग कार्यालय येथे पत्रव्यवहार केला आहे.यंदा गुरुवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. त्यामुळे ९ मार्च ते १२ मार्च या दरम्यान बसेस उरण आगारातून सोडण्यात याव्यात अशी मागणी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणतर्फे उरण बस आगार व्यवस्थापक गीता कोंडार यांच्याकडे ही मागणी नोंदवण्यात आली आहे.मुंबई कार्यालय, उपविभाग कार्यालय यांचा पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे तसेच उरण आगाराचे व्यवस्थापक गीता कोंडार यांनी या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.