खवळलेल्या समुद्राचे पाणी थेट गणपतीपुळे मंदिर परिसरात शिरले!

गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसासह समुद्राला उधाण आले असून, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. यामुळे समुद्राचे पाणी थेट येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिराच्या प्रसाद वितरण लाईनपर्यंत पोहोचल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, सध्या येथे समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून समुद्राच्या लाटा अधिकच उग्र होत असून, किनारपट्टीवर त्यांचा जोर वाढलेला आहे. अजस्त्र लाटांचा मारा इतका तीव्र आहे की, समुद्राचे पाणी मंदिर परिसरात प्रवेश करत आहे. देवस्थान समितीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पावसामुळे आणि वाऱ्याच्या जोरामुळे समुद्र खवळलेला आहे.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!
या नाट्यमय दृश्याला पाहण्यासाठी भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने किनाऱ्यावर जमले असून, उंच उंच लाटा पाहताना अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो कैद केल्याचेही दिसून आले. प्रशासनाकडून समुद्राच्या जवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.