खेडमधील जगबुडी, राजापूरची कोदवली नदी धोका पातळीच्या वर

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस कोसळत असून खेडमधील जगबुडी तर राजापूरमधील कोवली नदी रविवारी रात्री ११:०० वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता संबंधित यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर राहिल्या आहेत.

रविवारी सायंकाळपर्यंतच्या स्थितीनुसार खेडमधील जगबुडी तर राजापूरमधील कोदवली नद्यांना पूर आल्याने या नद्यांच्या काठावरील अनुक्रमे खेड आणि राजापूरमधील नागरिक सतर्क झाले आहेत. रात्रभर असाच पाऊस पडला तर सोमवारी या दोन्ही शहरांना पुराचा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

जिल्हाभरात सध्या कोसळत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता खेड चिपळूण, संगमेश्वर तसेच राजापूरमध्ये यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार खेडमधील जगबुडी नदी तसेच राजापूरमधील कोदवली नदी या दोन्ही नद्या सध्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड तसेच राजापूर या दोन्ही बाजारपेठांमधील व्यापारी धास्तावले आहेत. याचबरोबर चिपळूण तसेच संगमेश्वरमध्येही पुराचा धोका असलेल्या भागातील व्यापारी तसेच नागरिक धास्तावले आहेत.