गाडी कोकणची, सोय गोव्याची!
रत्नागिरी : मागील काही वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोकणातील प्रवासी जनतेसाठी कोकण रेल्वे मार्गावर बांद्रा येथून वसई मार्गे कायमस्वरूपी रेल्वे गाडी चालवण्याची घोषणा रेल्वेने केली. मात्र, या गाडीला देण्यात आलेले थांबे पाहून कोकण रेल्वेला प्रवासी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसते आहे. या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा हा कोकणातील प्रवासी संघटनांनी केला. पण, गाडी सावंतवाडी ऐवजी मडगावला नेऊन रेल्वेने कोणाचे हित साधले, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोकणातून थेट मुंबई उपनगरात जाणारी कायमस्वरूपी गाडी नसल्याने बांद्रा, बोरिवली किंवा वसई येथून कोकण साठी स्वतंत्र गाडी सोडावी, अशी सातत्याने मागणी होत होती. यासाठी कोकण विकास समितीसह कोकणवासीयांचा समावेश असलेल्या प्रवासी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर रेल्वे बोर्डाने बांद्रा ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी मंजूर केली आहे.
मुंबईतून गोव्यासाठी अनेक गाड्यांचे पर्याय असताना पुन्हा गोव्यासाठी गाडी का?
वास्तविक सध्या मुंबईतून गोव्यापर्यंत जाण्यासाठी अनेक गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. खुद्द गोव्यातल्या लोकांनी देखील अशा गाडीची कधी मागणी केल्याचे वाचनात देखील आले नाही. असे असताना मुंबईतून सावंतवाडीसाठी खऱ्या अर्थाने ट्रेन सुरू करण्याची गरज होती. रेल्वे बोर्डाने ही गाडी मंजूर केली मात्र, तिचा प्रवास सावंतवाडीला संपवण्याऐवजी ती पुढे मडगाव पर्यंत जाहीर करून टाकली.
देश-विदेशातून गोवा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गोव्यातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी होते. मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेससारख्या गाड्या तर अनेकदा गोव्यातूनच भरून येत असल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीपासून पुढील स्थानकांवर बसणाऱ्या प्रवाशांना गाडीत पाय ठेवायला देखील जागा नाही, अशी स्थिती बऱ्याचदा पाहायला मिळते. त्यामुळे सावंतवाडीपर्यंत प्रवास संपणारी गाडी सुरू होणे अपेक्षित होते. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होणारी गाडी देखील अशाच प्रकारे असेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी रेल्वेने मडगावपर्यंत जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे सावंतवाडी पासून पुढे कणकवली, रत्नागिरी चिपळूण या स्थानकांवर चढणाऱ्या प्रवाशांना नवी गाडी सुरू होऊही पुन्हा तशाच प्रकारच्या गर्दीच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे.
मागणी काय आणि दिले काय ?
कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होणारी गाडी ही मुंबईतून विशेषत: कोकणात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी गाडी असावी, अशी सर्वसामान्य प्रवाशांची दीर्घकाळाची मागणी होती. यानुसार रेल्वेने गाडी जाहीर केली खरी पण, थांबे देताना जी कंजूषी दाखवून दिली आहे, त्यावरून प्रवासी संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नव्याने जाहीर केलेल्या गाडीचा शुभारंभ मुंबईत बोरिवली स्थानकावर गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी होतो आहे. मात्र कोकणवासीयांनी मागितले काय आणि मिळाले काय अशी परिस्थिती या गाडीबाबत निर्माण झाली आहे.
अजूनही वेळ गेली नाही
पुरेसे थांबे द्या.. अन्यथा रोषाला सामोरे जा
कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या गाडीला तुतारी एक्सप्रेसप्रमाणे थांबे द्यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वेकडे आधीच केली होती. असे झाले तरच संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवासी जनतेला त्याचा लाभ होईल, असे रेल्वेला पटवून देण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेने गुरुवारी शुभारंभ होत असलेल्या गाडीचे थांबे ठरवताना सर्वसामान्य प्रवाशांचा विचार खरच केला का, असा सवाल प्रवासी संघटनांनी व्यक्त केला आहे.
खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूरसह वैभववाडी तालुक्यात एकही थांबा नाही
नव्याने सुरू होत असलेल्या गाडीला कोकण रेल्वे मार्गावर खेड संगमेश्वर लांजा राजापूर तसेच वैभववाडी तालुक्यात एकही थांबा दिलेला नाही. खेड रेल्वे स्थानकावर तर देशातील अत्यंत प्रतिष्ठेची समजले जाणारी वंदे भारत देखील थांबते. मात्र बांद्रा ते मडगाव मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या एक्सप्रेसला या स्थानकावर थांबा देण्यात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खेडमधील प्रवासी जनतेच्या वतीने शिवसेनेने बुधवारी या संदर्भात खेड स्टेशन मॅनेजर यांच्यामार्फत कोकण रेल्वेला निवेदन देऊन नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मडगाव- बांद्रा एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली आहे.