महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

गुहागर मतदारसंघातील नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक

एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्कतेने वाहनांची तपासणी करावी : अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे

रत्नागिरी, दि. २६: एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्क राहून वाहनांची तपासणी करावी. रिकाम्या फिरणाऱ्या संशयित रुग्णवाहिकांची देखील तपासणी करावी, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिली.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या आदेशाने विविध पथकांनी आज विधानसभा मतदार संघात जावून तेथील तयारीचा आढावा घेतला. त्या अंतर्गत 264- गुहागर विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीबाबत श्री. बर्गे यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, तहसिलदार परिक्षीत पाटील आदी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे म्हणाले, दिवाळीच्या तोंडावर भेट वस्तूंच्या नावावर काही संशयास्पद साहित्यांची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी छोट्या वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांची देखील कसून तपासणी करावी. वाहनातील संशयास्पद जागा प्राधान्याने पहाव्यात. अशा ठिकाणी मद्यसाठा, अवैध रोकड लपवलेली असू शकते. अद्याप कोणतीही कारवाई एफएसटी, एसएसटी यांच्याकडून झालेली दिसत नाही. पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक या सर्वांनीच त्यासाठी अर्लट मोडवर रहावे.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जगताप यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. 1 लाख 15 हजार 329 पुरुष मतदार संख्या तर 1 लाख 26 हजार 976 स्त्री मतदार संख्या अशी एकूण 2 लाख 42 हजार 305 मतदार संख्या आहे. 322 मतदान केंद्रांवर 322 व्हील चेअर्स उपलब्ध आहेत. फिरत्या पथकांनी 2151 वाहनांची तपासणी केली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकांनी 2171 वाहनांची तपासणी केली आहे. उत्पादन शुल्क विभागामार्फत 93 हजार 730 रुपयांची 2 हजार 103 लि. अवैध तसेच गोवा बनावटीचे मद्य पकडले आहे. त्याचबरोबर मतदान जनजागृती विविध कार्यक्रम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.


मतदान केंद्राना भेटी

अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली न.2, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबलोली नं.२ पागडेवाडी, स्थिर सर्वेक्षण पथक आबलोली चेक पोस्‍ट, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वरवेली नं.2, श्रीमती रकुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालशेत येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी केली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button