गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची ॲग्रीव्हिजन २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी

चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे 1 एप्रिल 2025 रोजी आयोजित तिसऱ्या कोकण प्रांत संमेलन ॲग्रीव्हिजन 2025 मध्ये गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी सावित्री श्रीशैल गुब्याड ने प्रश्नमंजुषा स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला. याशिवाय, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवून कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योगांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.
या संमेलनात विद्यार्थ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवीन कृषी पद्धती आणि कृषी क्षेत्रातील संधी यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांशी संवाद साधला. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात मदत होईल.