दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी शिष्टमंडळाची पुन्हा एकदा रेल्वे कार्यालयावर धडक

मुंबई : दादर – रत्नागिरी पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी, या मागणीचा दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयावर धडकले. ही गाडी दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ रत्नागिरी ते दादर मार्गावर सुरू असलेली पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यापर्यंतच जाऊ लागली आहे. ती पुन्हा पूर्वीप्रमाणे दादर ते रत्नागिरी याच मार्गावर सोडली गावी यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. मागील भेटीच्या वेळी त्यांनी यासाठी दिनांक एक मार्च रोजी रेल रोको चा इशारा देखील दिला आहे.
दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच सुरू न झाल्यास शिवसेनेने या आधीच दि. १ मार्च 2025 रोजी रेल रोकोचा इशारा दिला आहे. तोपर्यंत मध्य रेल्वेने याबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत.
– खा. अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
शिवसेना शिष्टमंडळाने (शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष) यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी अदादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.
शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.