नवनिर्माण महाविद्यालयात हिंदी भाषा दिन साजरा

रत्नागिरी : नवनिर्माण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी भाषा दिन गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
हिंदी भाषा दिन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील हिंदीचे प्रा. कृष्णात खांडेकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे हे मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. निकिता नलावडे यांनी केले. त्यानंतर हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागीना गौरविण्यात आले. कथा लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक सोहम पानगले, द्वितीय क्रमांक मुजाहिरा इब्जी, तृतीय क्रमांक मानसी बाईंग तर उत्तेजनार्थ म्हणून सलोनी राजिवले यांना गौरविण्यात आले. त्यानंतर मुन्शी प्रेमचंद यांच्या कथाचे भित्तीपत्रक प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वैश्विकरण आणि हिंदी भाषा या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते खांडेकर म्हणाले, ” भारताची हिंदी भाषा जागतिक होत असून जगभरातील अनेक देशांमध्ये भाषेने पाळेमुळे रोवली आहेत. इंग्लिश भाषेच्या बरोबरीने आज जगात हिंदीचा बोलबाला सुरु आहे. भारतात विविध राजभाषा असताना जनसामान्य लोकांची भाषा म्ह्णून हिंदी भाषा भारतीय जनाना एकत्र आणत आहे, हे अभिमानास्पद आहे.”
प्राचार्या डॉ जगदाळे म्हणाल्या, ” प्रत्येकाने हिंदी या राष्ट्रभाषेचा वापर करताना त्यात इंग्लिश शब्दाचा येणारा उल्लेख कटाक्षाने टाळायला हवा. तरच भाषेचा मान राखला जाईल. “
या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत शेट्ये याने केले तर आभार रिया शिरवडकर हिने मानले.