मडगाव-वांद्रे वसई मार्गे गाडीच्या नियमित फेऱ्या ३ सप्टेंबरपासून
अपुऱ्या थांब्याबाबत कोकणवासियांमध्ये प्रचंड नाराजी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव या नव्या गाडीचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी दुपारी होत आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून मडगाव ते वांद्रे या मार्गावर नियमितपणे या गाडीच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
बोरिवली स्थानकात शुभारंभ होत असलेली वांद्रे मडगाव कायमस्वरूपी गाडी पहिल्या प्रवासासाठी बांद्रा टर्मिनसमध्ये आली तेव्हाचे छायाचित्र
गाडीचा शुभारंभ बोरिवली रेल्वे स्थानकात होत आहे. रेल्वे बोर्डाकडून या गाडीला मंजुरी मिळाल्यानंतर तिचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. गाडीच्या नेहमी तर यांचा आरक्षण ऑनलाइन तसेच आरक्षण खिडक्यांवर सुरू झाले आहे.
तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर थांबे देण्याची जोरदार मागणी
कोकणवासी यांच्या मागणीनुसार ही गाडी जाहीर झाली खरी मात्र गाडीचे थांबे ठरवताना रेल्वेने प्रवासी जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न मिळाल्याने नवी गाडी मिळाल्याच्या आनंदापेक्षा गाडीला देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांवरून रेल्वेवर प्रचंड टीका होत आहे. गाडीच्या नियमित फेऱ्या या ३ सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत. याचा विचार करता रेल्वेला अजूनही गाडीला पुरेसे थांबे देण्याची संधी आहे.
इतकी वर्षे गाडीसाठी संघर्ष झाला आता थांबे मिळवण्यासाठी पुन्हा संघर्ष करायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. नव्या गाडीला पुरेसे थांबे मिळाले नाही तर आम्ही स्वस्थ बसणार नाही.
– अक्षय महापदी, प्रथमेश प्रभू, रेल्वेविषयक अभ्यासक, मुंबई.