महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

मतदारांना मतदानादिवशी सुट्टी जाहीर


रत्नागिरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचवचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहे.


कार्यासन अधिकारी खामकांत सोनवणे यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानांचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.


वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे.
हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक 202403221710362810 असा आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button