मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे १६ पासून ‘शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन’ प्रशिक्षण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शासकीय मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी च्या मत्स्यसंवर्धन विभागातर्फे दि. १६ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत “शोभिवंत मत्स्यपालन, प्रजनन व व्यवस्थापन ” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थींची संख्या वीस पर्यंत मर्यादित असून प्रत्यक्ष उपस्थितीसह हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणात सहभागी होण्याकरीता प्रत्येक प्रशिक्षणार्थींना रुपये 3 हजार इतके प्रशिक्षण शुल्क जमा करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण कालावधीत आपल्या निवासाची व जेवणाची व्यवस्था व प्रवास खर्च स्वतः करावयाचा आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमातील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गास उपस्थिती आवश्यक असून त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शोभिवंत मत्स्यसंवर्धन प्रकल्पासाठी जागा निवड, शोभिवंत मत्स्यसंवर्धन आवश्यक उपकरणे व वापर, जिवंत व कृत्रिम खाद्य निर्मिती, आरोग्य व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल या विषयी विस्तृत माहिती सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गात देण्यात येईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी प्रशिक्षण समन्वयक डॉ. राजू तिबिले ९४२२९१११७६, डॉ. वर्षा भाटकर ९४२०८४२७५३, डॉ. संगीता वासावे ९४२१२२९४०१, सौ अपूर्वा सावंत ९३७०९६८८११ आणि आयोजक डॉ. सुरेश नाईक ८२७५४५४८२१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रकाश शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी यांनी केले आहे.