मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय, दादागिरी सहन करणार नाही : ना. उदय सामंत
मुंबई : मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय किंवा दादागिरी सहन केली जाणार नाही, असे राज्याचे मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सुनावले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर येथे आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी हे ग्रंथालय सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनसंस्कृती केवळ जोपासली जात नाही, तर ती अंगीकृत केली पाहिजे. आगामी काळात ग्रंथालयाकडे येणाऱ्या वाचकांची संख्या वाढली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
बौद्धिक विकासासाठी पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. देशभक्तीची बीजे पेरण्याचे कार्य केवळ पालकांनीच नव्हे, तर प्राथमिक शिक्षकांनीही करायला हवे. डिजिटल यंत्रणांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व्हावा, याकडे लक्ष द्यायला हवे, असेही ना. सामंत म्हणाले.
यावेळी लहान मुलांसाठी बाल साहित्य संमेलन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवा साहित्य संमेलन, तसेच महिलांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलन सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की जगभरातील भाषांमध्ये मराठीचा १७ वा क्रमांक असून ती एक सामर्थ्यशाली भाषा आहे. आज परदेशातील लोकही मराठी शिकत आहेत, याकडे त्यांनी विशेषतः लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ताई, विविध मान्यवर पदाधिकारी, शिक्षक तसेच ग्रंथालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.