महिला शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन केले तरच शेतीचा शाश्वत विकास होईल : कुलगुरू डॉ. संजय भावे

रत्नागिरी: शिरगाव रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन येथे रत्न सागर शेतकरी उत्पादक कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि सदस्यांना संबोधित करताना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सांगितले की, कोकणात शेतकरी उत्पादक कंपनी यांनी शेतीतील उप्तादन कच्चा माल म्हणून न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून पक्का माल म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ तयार करावेत. शेती फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महिला शेतक-यांना मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यापीठामार्फत दिले जाईल. मूल्य वर्धित पदार्थ तयार करण्यासाठी विद्यापीठ महिला शेतक-यांना पूर्ण सहकार्य करेल. यावेळी डॉ. भावे सर यांनी विविध यशस्वी शेतक-याची उदाहरणे देवून शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना प्रोत्साहित केले.
शिरगाव पंचक्रोशीत रत्नसागर शेतकरी उत्पादक कंपनी (एफ.पी.सी) स्थापन करण्यात आलेली असून, कंपनीच्या महिला शेतकरी सदस्यांना काही व्यावसायिक आणि तांत्रिक समस्या भेडसावत होत्या. त्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी महिला शेतकरी सदस्यांनी मत्स्य अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मदतीने कुलगुरू महोदय यांची मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा कुलगुरू महोदय याचे तांत्रिक अधिकारी डॉ मंदार खानविलकर हजर होते. मा कुलगुरू महोदय यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मा कुलगुरू महोदय यांनी महिला शेतक-याच्या समस्या ऐकून घेतल्या त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यापीठाची कृषी दैनदिनी भेट दिली आणि शिरगाव येथे महिला शेतकरी मेळावा आणि मूल्यवर्धित पदार्थ प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जलजीविका, रत्नागिरीचे अधिकारी पियुषा शेलार, शशांक पंडित आणि मत्स्य तंत्रनिकेतन चे गियर टेक्निशियन श्री सुशील कांबळे हजर होते. उपस्थित सर्व महिला शेतकरी सदस्यानी मा कुलगुरू डॉ. संजय भावे आणि प्राचार्य डॉ केतन चौधरी याचे आभार मानले.





