मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘महाविस्तार-एआय’ ॲप विषयी मार्गदर्शन

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात ‘महाविस्तार-एआय’ या ॲपची माहिती देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे तालुका कृषी अधिकारी श्री. शत्रुघ्न मेत्रे, कृषी अधिकारी श्री. भीमाशंकर कोळी, उपकृषी अधिकारी श्री. पिसाळ आणि सहाय्यक कृषी अधिकारी राजश्री निंबाळकर मॅडम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री.शत्रुघ्न मेत्रे यांनी ॲपची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘डिजिटल मित्र’ म्हणून काम करेल. यामध्ये एआय-आधारित चॅटबॉटची सुविधा असून, शेतकरी आपल्या भाषेत शंका विचारून तत्काळ उत्तरे मिळवू शकतात. पिकांचे योग्य नियोजन करण्यासाठी हवामान अंदाज, पीक सल्ला आणि पीक प्रमाणित कार्यपद्धती एका क्लिकवर उपलब्ध आहेत. तसेच, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी मृदा आरोग्य पत्रिका, पिकांसाठी अचूक खत गणना आणि कीड-रोग नियंत्रणाचे उपाय यांचाही यात समावेश आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजारभाव, गोदाम उपलब्धता, औजार बँक आणि शासनाच्या डीबीटी योजनांची माहिती देखील या ॲपमध्ये समाविष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. हे ॲप भविष्यातील ‘स्मार्ट शेती’साठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञान आणि ॲपची माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, तसेच दोन्ही महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कु. वैभव पवळ याने केले.





