मुंबई-सावंतवाडी विशेष ट्रेन शनिवारी धावणार !

- दादर पासून पुढे तुतारीप्रमाणेच थांबे
- गर्दीचा हंगाम नसताना, कोणतीही मागणी नसताना विशेष गाडीचे नियोजन केल्याने आश्चर्य
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष रेल्वे गाडी शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी धावणार आहे. भर पावसाळा तसेच प्रवाशांची या गाडीबाबत कोणतीही मागणी नसताना ही विशेष गाडी ती देखील निम्मे डबे वातानुकूलित असलेली सोडली जात असल्याने प्रवासी वर्गाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विशेष गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी (01171) ( 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर ) दिनांक 22 जून रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती सिंधुदुर्गात सावंतवाडी टर्मिनसला ती दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (01172) सावंतवाडी येथून दि. २२ जून रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी तीन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
एकूण १८ डब्यांच्या या विशेष गाडीला सहा डबे सर्वसाधारण श्रेणीतील ( जनरल) तर उर्वरित वातानुकूलित+एस एल आर चे असतील.

आय आर सी टी सी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण प्रणालीनुसार दादर नंतर या गाडीचे थांबे तुतारी एक्सप्रेस प्रमाणेच आहेत. सध्या गर्दीचा हंगाम नाही. शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या देखील संपलेल्या आहेत. अशा स्थितीत कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी सोडली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
भर पावसाळ्यात सावंतवाडीसाठी विशेष गाडी…तीही वातानुकूलित डबे असलेली!
एरव्ही गणेशोत्सव असो की, उन्हाळी हंगाम… कोकणवासीयांच्या वतीने विविध प्रवासी संघटनांनी मागणी करूनही जादा गाड्या सोडल्या जात नाहीत. अशा स्थितीत आता भर पावसाळ्यात सावंतवाडीसाठी चक्क वातानुकूलित डबे असलेली गाडी सोडण्याची कल्पना रेल्वेला नेमकी कशी बरी सुचली असावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘प्रवाशांनी मागितली तर साधीही देणार नाही, नाही मागितली तर एसी गाडी देऊ’, असेच तर रेल्वेचे धोरण नाही ना, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.