रत्नागिरी अपडेट्स

रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

रत्नागिरी : येथील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या गावकरी,मानकरी आणि विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दि. 24 फेब्रुवारीपासून साजऱ्या होणाऱ्या श्री भगवती देवीचा शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

दि. 24.02.2023  रोजी सकाळी देवीच्या अंगावर रूप लागणार असून 25.02.2023 रोजी सकाळी ११.०० वा. देवीची निशाणकाठी उभी केली जाईल. दुपारी २.०० वा. लहान मुलगा देवीचे रूपाने सजविला जातो व देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ वाजतगाजत भगवती मंदिरातून भैरी मंदिर, जोगेश्वरी मंदिर, नवलाई पावणाई मंदिर, पोलीस स्टेशन महापुरुषाला हात भेट घेतली जाते व परत देवीच्या मंदिरात येणे होते. जाताना वाटेवरील ग्रामस्थ देवीच्या रूपाने सजविलेल्या मुलाची तसेच निशाण व अबदागीरची पूजा करतात.

06/03/2023 रोजी सोमवार दुपारी १.३० वा. देवीच्या रूपाने सजविलेला लहान मुलगा देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह किल्ला गावातील मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ देवीची होळी आणण्यासाठी खालचा फगरवठार येथील श्रीनिवास दिक्षीत यांच्या घरी जाईल आणि होळीची पुजा करून गाहाणे घालून ती होळी तोडून भैरी मंदिर वरुन येवून, दांडा फिशरीज येथे थांबुन होळीच्या बुध्यांकडील भागाचा ताबा पेठकरांच्या ( तटबंधी बाहेरील पेठकिल्याच्या परीसरात रहाणारे ग्रामस्थ )यांच्या ताब्यात दिली जाते.

ही होळी राममंदिर ( पेठकर म्हणजे किल्याच्या मार्गे किल्याच्या बोगद्यामध्ये येते. त्या ठिकाणी पेठकर होळीच्या बुध्यांचा ताबा परत किल्लेंकरांकडे देतात. तेथून होळी भागेश्वर मंदिर, पारावरच्या मारुती देवळाकडून ठिक १२.०० वा. देवीच्या मंदिरामध्ये येऊन होळीचा होम पेटविला जातो. होळी घेवून येताना वाटेत जागोजागी देवीचे रूप घेतलेल्या मुलाची व निशाण व अबदागीरीची पुजा केली जाते.

07/03/2023  मंगळवार – दुपारी १.३० वा. देवींच्या रूपाने सजविलेला लहान मुलगा, देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह किल्ला गावातील मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ सर्व होमातील राख घेऊन चव्हाटा, होळ देव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, मुख्य मानकरी यांच्या घरातील देव, मारुती मंदिर पार, गणेश मंदिरात धुळवड उडवतात. नंतर भैरी मंदिर, गुजर व खैर यांच्या घरी नंतर झाडगांव येथील सावंत यांच्या घरी जाऊन परत मंदिरात येणे होते.

12/03/2023 रविवार दुपारी ४.०० वा. चव्हाट्याजवळ मुख्य मानकरी यांच्या हस्ते बलीदानाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर देवीच्या रूपाने सजविलेला लहान मुलगा, देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ वाजतगाजत प्रथम देवीवर रंग उडवतात व नंतर चव्हाटा, होळ देव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, मुख्य मानकरी यांच्या घरातील देव, मारुती व गणेश मंदिरात रंग उडवतात. त्यानंतर तेथून मुख्य मानकरी यांच्या घरी देवी निशाणासह येऊन बसते व रात्री १०.०० वाजल्यानंतर आराव्यासाठी देवळात जाते. रात्री १२.०० वा. गोंधळ घातला जातो व तटबंदी भोवती वाजतगाजत एक प्रदक्षिणा घातली जाते व देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना प्रत्येक बुरुजावर मुख्य मानकरी नारळ देतात व अंगारा उडवतात. तद्नंतर गोंधळाचा उर्वरीत कार्यक्रम होऊन, देवीची बैठक घालून मुख्य मानकरी यांच्या हस्ते मानकऱ्यांना मानाचे नारळ व देवीच्या उत्सवात काम करणाऱ्यांना प्रसादाचे नारळ दिले जातात त्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button