रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवासह पाककला स्पर्धा शुक्रवारी

रत्नागिरी : कोकणच्या वनसंपत्तीचा आणि रानभाज्यांच्या औषधी गुणांचा परिचय शहरी भागातील नागरिकांना करून देण्यासाठी रत्नागिरी येथे १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अंबर हॉल, टी. आर. पी. रत्नागिरी येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने अनेक औषधी वनस्पती आणि रानभाज्या पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवतात. या रानभाज्यांची ओळख शहरी लोकांना व्हावी, त्यांच्या पाककृतींची माहिती मिळावी, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीतून आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात खालील उपक्रमांचा समावेश आहे.
रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा: सकाळी १० ते १२ या वेळेत पाककला स्पर्धेचे उत्कृष्ट नमुने निवडले जातील आणि विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हर्षला गजानन पाटील (९४२२४४१५७१) आणि नेहा पवार (९४२३२०३६४१) यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांना वाहनांचे अनुदान वितरण: सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वाहनांचे अनुदान दिले जाईल.
आयात-निर्यात कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलन: जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाधारकांसाठी आयात-निर्यात कार्यशाळा आयोजित केली आहे, जेणेकरून त्यांना व्यवसायात मदत होईल.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतिवार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.