रत्नागिरी जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ४७० महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
रत्नागिरी, दि. 21 : पाचही विधानसभा मतदार संघासाठी काल झालेल्या मतदानाची जिल्ह्याची सरासरी 65.23 टक्के आहे. मतदान सर्वत्र शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले. 2019 च्या तुलनेत चार टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वात अधिक 69.04 टक्के चिपळूण मतदार संघात तर सर्वात कमी गुहागर 61.79 टक्के मतदान झाले आहे. काल झालेल्या मतदानामध्ये 4 लाख 46 हजार 470 महिला, 4 लाख
27 हजार 363 पुरुष तर 4 इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती जिल्हा
निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर काल सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनामार्फत मतदारांसाठी मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, आरोग्य सुविधा आदींची सोय केली होती. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी 61.22 होती. तर लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची सरासरी 59.77 होती. 2024 च्या लोकसभेत जिल्ह्याची सरासरी 58.03 टक्के होती. या तुलनेत काल झालेल्या मतदानात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. काल झालेल्या मतदानामध्ये 2 बीयु, 2 सीयु आणि 5 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले.
विधानसभा मतदार संघनिहाय काल झालेले मतदान पुढीलप्रमाणे –
263- दापोली-पुरुष 94 हजार 979, महिला 99 हजार 718. टक्केवारी 66.84
264- गुहागर-पुरुष 70 हजार 583, महिला 79 हजार 374. टक्केवारी 61.79
265-चिपळूण-पुरुष 95 हजार 816, महिला 94 हजार 776. टक्केवारी 69.04
266- रत्नागिरी- पुरुष 90 हजार 651, महिला 94 हजार 938. इतर 4. टक्केवारी 63.73
267- राजापूर-पुरुष 75 हजार 334, महिला 77 हजार 664. टक्केवारी 64.17
जिल्ह्यातील 4 लाख 27 हजार 363 पुरुष तर 4 लाख 46 हजार 470 महिला व 4 इतर मतदार अशा
एकूण 8 लाख 73 हजार 837 मतदारांनी काल मतदान केले.
राज्याचे विशेष सामान्य निरीक्षक राम मोहन मिश्रा, सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित जरांगल, सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक राजेंदर प्रसाद मीना (पोलीस) यांनी बैठक घेऊन तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. शांततेत मतदान होण्यासाठी उमेदवारांचेही चांगले सहकार्य लाभले. तसेच जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती उपक्रम राबविले होते. विशेषत: मच्छिमारांसाठी केलेल्या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचे सर्व निवडणूक अधिकारी, सहाय्यकbनिवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार या सर्वांच्या सहकार्यामुळे मतदान शांततेत, सुरळीत
आणि उत्साहात पार पडले, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.