रत्नागिरी रेल्वे स्थानक थांबा प्रवाशांचा की गुरांचा?

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळील प्रवाशांचा थांबा सध्या मोकाट गुरांचा अड्डा बनला आहे. मिऱ्या (रत्नागिरी) ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील या थांब्यावर मोठ्या संख्येने जनावरे बसलेली असल्याने प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील एक मध्यवर्ती स्थानक असल्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते. रेल्वेतून उतरल्यानंतर आजुबाजूच्या गावांमध्ये जाण्यासाठी प्रवासी जवळच असलेल्या कुवारबाव येथील बस थांब्याचा वापर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा थांबा मोकाट गुरांनी व्यापला आहे. ही जनावरे रस्त्याच्या कडेला किंवा थेट रस्त्यावर बसलेली असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या या त्रासामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यावर तत्काळ उपाययोजना करून या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे. स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.