लांजातील काजळी नदी अजूनही इशारा पातळीवरच!
तालुक्यात घर, गोठ्यांच्या पडझडीच्या घटना
लांजा : पावसाचा जोर थोडासा कमी झाला असला तरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीचे पाणी कमी झाले नसुन नदी इशारा पातळीवर वाहत आहे. गेले दोन दिवस धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यात गोठे, घरावर वृक्ष पडल्यामुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला असुन सहा पोल पडल्यामुळे आहेत मात्र कुठेही जीवीत हानी झालेली नाही.
मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे काजळी, मुचकुंदी नदीला पूर आला आहे. काजळी नदीचे पाणी ओसरत नसुन इशारा पातळी गाठलेली आहे. पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जराही उसंत न घेता पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. निवसर येथे विजेचे तीन पोल, पन्हळे गावी एक, केळंबे गावी दोन, तर खेरवसेत एक पोल पडला आहेत.
अतिवृष्टीमुळे संजय आत्माराम पत्याणे रा.वाघ्रट यांच्या मालकीच्या गोठ्याची इमारत कोसळून 12000 रू नुकसान झाले. राजाराम कदम इसवली यांचा गोठा पूर्णत: कोसळून 11000 रू नुकसान, दीपक पांडुरंग रेवाळे (राहणार भडे ) यांच्या घरातील पडवीचे तर केळंबे येथील प्रतिक्षा प्रकाश केळंबेकर याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्यामुळे पत्रे फुटून नुकसान झाले.
तालुक्यातील उपळे येथील यशवंत भानू कुर्तडकर याच्याही घराचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले असुन शेतक-याच्या शेतीचेही नुकसान झाले आहे.