‘सिंधुरत्न’मधून स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम : संदेश सावंत
- युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांना लाखोंची बक्षिसे, शैक्षणिक टॅब देऊन सत्कार
रत्नागिरी : सध्याच्या आव्हानाच्या युगात स्पर्धा परीक्षांना खूप महत्त्व आहे . भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांनी लहान वयापासून स्पर्धा परीक्षांची कास धरायला हवी. स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करण्यासाठी आणि पाया मजबूत करण्यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी केले.
रत्नागिरी येथील माध्यमिक पतपेढी येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले, यावेळी सावंत बोलत होते.
कार्यक्रमात २०५ गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब, रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक विभागातून महेश नवेले- शाळा रनपार, व माध्यमिक विभागातून राजेंद्र वारे-गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे यांना ‘युवा संदेश आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संजय सावंत, लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दीपक नागवेकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दीपक माळी, शिक्षक समितीचे उपाध्यक्ष अनाजी मासये, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश काजवे, संचालक विजय खांडेकर, विशाल घोलप, मनिष देसाई, विभा बाणे, विमल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधुरत्न परीक्षा जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी, उमेश केसरकर, सुहास वाडेकर, संतोष देवळेकर, रघुनाथ काकये, संदीप मोरे, श्रीम. राजवाडे, हेमंत ऐवळे, राजेंद्र खेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांना विमानाने घडवणार इस्रोची सफर
पुढील परीक्षा रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या वर्षापासून ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी जाहीर केले. या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी श्रीधर दळवी (9284185353) आणि उमेश केसरकर (7745823992) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.