कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर झाला सोनेरी किरणांचा अभिषेक !
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात आज बुधवारी सकाळी बरोबर ७ वाजता श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडील सूर्य किरणांनी शंभू महादेवांना सोनेरी सचैल किरणांचे स्नान घातले. वातावरणात पसरलेला भक्तिभाव आणि मंदिराच्या गाभाऱ्यात सर्वत्र पसरलेला सोनेरी प्रकाश असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. आज ६.४७ वाजता सूर्योदय झाला आणि पुढील दहा – बारा मिनीटातच किरणोत्सवाचा सोहळा पहायला मिळाला.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सूर्य मावळतीला गेल्यानंतर किरणोत्सव संपन्न होतो. कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने येथे सकाळच्या प्रसन्नवेळी किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा पहायला मिळतो . खगोल शास्त्र , स्थापत्य शास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा असल्याचे मत यावेळी भाविकांनी व्यक्त केले . सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला.
अकराव्या शतकातील शिल्प समृद्ध मंदिर अशी कर्णेश्वर मंदिराची ओळख आहे. राज्यासह देश विदेशातील शिल्प अभ्यासक या मंदिराला भेट देत असतात. या मंदिरात किरणोत्सव संपन्न होत असल्याने आता दरवर्षी हा नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भाविक उपस्थित रहातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.